Monday, 25 July 2016

🌼🌼🌼भीमरूपी महारुद्र वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना|| १ ||

समर्थांनी अनेक रचना केल्या. त्यापैकी मारुती स्तोत्र आणि मनाचे श्लोक या दोन रचना मुखोद्गत केल्या जातात. समर्थ रामदासस्वामी लिखित भीमरूपी स्तोत्रे मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे,त्याच्या गुणविशेषांचे वर्णन करणारी आहेत. अत्यंत प्रासादिक अशी ही रचना आहे. समर्थाची ही स्तोत्रे एक उर्जेचा स्रोत आहेत. निर्भयता, आत्मविश्वास या गुणांनी युक्त असणाऱ्या हनुमंताच्या या स्तोत्राच्या नित्य पठणाने भय कमी होतेच पण आजच्या संघर्षमय जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची उर्जां प्राप्त होते.
समर्थांनी आपले उपास्य दैवत जो हनुमंत याच्या स्तुतीपर जी मारुतीस्तोत्रे लिहिली ती त्यांना स्फुरली कशी या विषयी असे सांगितले जाते की, समर्थाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर एकदा ते ध्यानस्त बसले असताना स्वत: हनुमंताने त्याना आपल्या आक्राळविक्राळ दिव्य भीमरूपाचे दर्शन घडविले. त्यांच्या रामभक्तीवर प्रसन्न होऊन त्यांना आनंदाने मिठी मारली तेव्हा समर्थाच्या तोंडून उस्फुर्तपणे ही स्तोत्रे बाहेर पडली. या स्तोत्र पठणाने सर्व संकटे व्याधी दूर होतात तसेच शनीचा त्रास देखील कमी होतो अशी या स्तोत्राची प्रसिद्धी आहे. या १३ मारुती स्तोत्रातील भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र विशेष लोकप्रिय झाले. एकूण १६ श्लोकांची ही रचना आहे. मारुतीच्या भव्यदिव्य रूपाचे दर्शन या स्तोत्रामधून घडते.मारुतीच्या सामर्थ्याची कल्पना येणारे हे स्तोत्र आहे.


|| श्री राम जय राम जय जय राम ||


No comments:

Post a Comment