Sunday, 10 July 2016

।। जय श्रीराम ।।

श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. श्रीराम हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. ह्या दिवशी १० जानेवारी इ.स.पू. ५११४ ही तारीख होती, असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेतील संशोधकांचे संशोधन सांगते. जन्मवेळ दुपारी १२ ते १ च्या दरम्यान असावी.


राम हा कवी वाल्मीकीने रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचा नायक आहे.

श्रीरामाच्या काही नावांचा उगम


राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.

रामचंद्र : रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.
श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.

सर्वार्थाने आदर्श

श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.

रामराज्य

पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते.

रामायणाचा काळ

वाल्मिकी रामायणातील रामकथा काल्पनिक आहे की राम एक ऐतिहासिक पुरुष होता याबद्दल संशोधकांत अनेक मतभेद आहेत. राम ऐतिहासिक व्यक्ती मानून तो नेमका कधी झाला यावरही पुष्कळ संशोधन करण्याचे प्रयत्‍न झाले आहेत.

रामायणकाळ इसवी सन पूर्व २००० पूर्वीचा नाही.


  • भारतात काही मंडळींना आपला इतिहास पुरातनातील पुरातन ठरवायचा आटोकाट प्रयत्‍न करण्याची हौस आहे. पुरातत्ववेत्त्यांच्या उत्तर प्रदेशातील विविध उत्खननांतून जे नागरी जीवनाचे पुरावे मिळतात ते इसपू २००० च्या पलीकडे जात नाहित. इसपू २००० ते इसपू १७५० या काळात पर्जन्यमान कमी झाल्याने सिंधू खोर्‍यातील काही लोकांनी गंगेच्या खोर्‍यात स्थलांतरे करत नागर संस्कृतीचा पाया घातला, तत्पूर्वी हा भाग ग्रामीण संस्कृतीचा होता हेही आता विविध उत्खननांतून सिद्ध झाले आहे. बी.बी. लाल यांनी केलेल्या उत्खननांवरून रामायणातील संस्कृती ही नागर व वन्य अशी मिश्र संस्कृती असल्याने ती इसपू २००० पूर्वीची नाही असे स्पष्ट म्हणता येते.
  • कोणताही अभ्यासक रामाचा काळ, त्याला ऐतिहासिक पुरुष मानले तरी इसपू १२०० च्या पलीकडेे नेत नाहीत.
  • भारतीय पुरातत्ववेत्ते एच.डी. सांकलिया हे रामायणकाळाला इसपू चवथ्या शतकापार नेत नाहीत.
  • रामायण व पुराणेही राम हा त्रेतायुगाच्या उत्तरार्धात झाला असे म्हणतात. सत्ययुगानंतर त्रेतायुग येते. त्रेतायुगाचा उत्तरार्ध धरला तरी हा काळ ८ लाख ६९ हजार वर्षे इतका जुना येतो. या काळात पृथ्वीवर माणूसच नव्हता, मग राम कसा असेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
  • रामेश्वरम पासून श्रीलंकेला जोडणारा व रामकाळी वानरसेनेने बांधला अशी श्रद्धा असलेला तरंगत्या पाषाणांच्या सेतूचेे वय, कार्बन डेटिंंगनुसार साडेसतरा लाख वर्ष इतके जुने येते. रामसेनेनेच सेतू बांधला हे म्हणणे मग जसे अतार्किक ठरते तसेच रामकाळही तेवढा मागे नेणे अतार्किक ठरते.


।। जय श्रीराम ।।
।।श्री राम जय राम जय जय राम ।।
।।जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
।। जय जय रघुविर समर्थ ।।

No comments:

Post a Comment