Wednesday, 10 August 2016


🌼🌼🌼येथे कां रे उभा श्रीरामा ।🌼🌼🌼


येथे कां रे उभा श्रीरामा ।
मनमोहन मेघश्यामा ।।
चाप बाण काय केलें ।
कर कटावरी ठेविले ।।
कां बा धरिला अबोला । 
दिसे वेष पालटला ।।
काय जाली अयोध्यापुरी ।
येथे बसविली पंढरी ।।
शरयूगंगा काय केली ।
कैची भीमा मेळविली ।।
किल्किलाट वानरांचे ।
थवे न दिसती तयांचे ।।
दिसे हनुमंत एकला ।
हा कां सैन्यातुनि फुटला ।।
काय जाली सीता सती ।
येथे बहुत जन दिसती ।।
रामदासीं सद् भाव जाणा ।
राम जाला पंढरिराणा ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला अभंग .
.
समर्थ रचीत हा अभंग म्हणजे आपल्या आराध्य देव किंवा देवतेचा किती ध्यास लागायला हवा याचे उत्तम उदाहरण आहे. पंढरपुरात पांडुरंगाची मुर्ती पाहुन त्यात देखील समर्थांनी राम पाहिला आणि रामाचे बदललेले हे रुप पाहुन समर्थ पांडुरंग रुपी श्रीरामाला अनेक प्रश्न विचारतात. आणि अखेरीस शेवटच्या दोन ओळीत समर्थ सांगतात खरा रामदासी तोच ज्याच्या अंतरी सद़्भाव आहे. तेव्हा खरा दास तोच जो बाहेर रुप कोणतेही असले तरी त्या रुपात समर्थांना पहातो आणि त्या रुपाच्या चरणी नम्र होतो, नतमस्तक होतो, त्या नवीन रुपाचा देखील आदर करतो. हनुमंताला प्रत्येक ठिकाणी राम दिसत असे, तोच ध्यास तोच भाव समर्थांमधे होता. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला ना की ती गोष्ट जेव्हा मिळते, होते तेव्हा ती सर्वोत्तम असतो. जगात ज्या ज्या लोकांनी काही भव्य दिव्य करुन दाखवले त्यांना त्या गोष्टींचा ध्यास लागला होता म्हणुनच ते या गोष्टी करु शकले. आता आपण आत्मपरिक्षण करायला हवे ना ? की आपल्याला असा समर्थांचा ध्यास लागला आहे का? की नुसते आपण तसे दाखवतो. उत्तर जे काही असेल ते इतरांना सांगायची गरज नाही. फ़क्त जर काही सुधारणा गरजेची असेल तर ती मात्र अवश्य करायलाच हवी. समर्थांना नेमके हेच तर हवे आहे.
।।जय सदगुरु।।

No comments:

Post a Comment