Monday, 29 August 2016

🌼🌼🌼परम पूज्य श्री कलावतीआईंची शिकवण :🌼🌼🌼

कलावतीआईंची शिकवण अशी आहे की - तुम्ही दुसऱ्याला अत्तर लावलेत तर तुमच्या हाताला वास येईल. तुम्ही कोळसा लावलात तर तुमचाच हात काळा होईल. म्हणजे तुम्ही जे पेराल ते उगवेल. बेसावधपणे कांहीतरी पेरून दुःखाचे धनी होऊ नका. कोणाचा तिरस्कार मानू नका. दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून आनंद माना. कुंपण जसे शेताचे रक्षण करते तसे आईवडिलांनी मुलांच्या मनात लहानपणापासून कुविचार शिरणार नाहीत आणि सुविचारांची वाढ होईल याची काळजी घेतली पाहिजे. मुलांचे मन लहानपणापासून देवाकडे वळवा म्हणजे त्यांचे शील उत्तम बनेल. त्यांची मने सुदृढ होतील. ती निर्भीड होतील. त्यांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे सहजच अभ्यासात त्यांचे लक्ष लागेल. तेणेकरुन ते उत्तम नागरिक बनून देशाचे आणि समाजाचे भविष्य उज्ज्वल करतील. तुम्ही अहोरात्र संसारात रहा पण त्यातील एक तास तरी सर्व व्याप बाजूला ठेवून नियमित देवाची आराधना करा. हरिस्मरण माणसाला सावध करते. त्यामुळे माणसाच्या हातून योग्य तेच घडते. मग सुखाला वाण कशी पडणार? मात्र तुम्ही जेवढे लक्ष देवाकडे द्याल त्याच्या हजारपटीने देव तुमच्याकडे लक्ष देईल. देवाचे लक्ष केव्हांही आमच्याकडे असतेच पण आमचेच लक्ष देवाकडे नसते म्हणून संसारात वरचेवर आम्हाला दुःख भोगावे लागते.
कलावतीआईं म्हणतात, ’तुम्ही ज्या देवाची पूजा करता तो ज्या सद्गुणांनी देवरुप झाला ते सद्गुण आपण आत्मसात केले पाहिजेत हे लक्षात ठेवा. तुमच्या वांटणीला जे कर्तव्य आले ते मनापासून, समरस होऊन आनंदाने करा. पण ते करीत असता क्षणभरही देवाला विसरू नका.’
संतांचे कार्य म्हणजे मनुष्यातील दुर्गुणांना मारून सद्गुणांची वाढ करणे! म्हणजे मनुष्यातील राक्षसी वृतीला मारून मनुष्यातील मनुष्यपणा जागृत करणे हेच होय. करिता घालून दिलेल्या नेमाप्रमाणे भजन, वाचन आणि नामस्मरण करित राहिले असता संकटांना न घाबरता तोंड देण्याचे मानसिक धैर्य लाभेल. हात घातलेल्या प्रत्येक कामात यश मिळत जाईल. त्रिविधतापाने तापलेले मन शांत होईल.
जो देवाची आठवण करतो त्याचे रक्षण करण्याचे भार देव घेतो म्हणजे मनुष्यावर संकटे येत नाहित असे नसून आलेली संकटे चुटकीसरशी निवारण होतात. संकटाशी झूंज देण्याचे धैर्य अंगी येते.
आपला जिवलग मित्र जो परमेश्वर त्याचे प्रेम संपादन करावयाचे तर संतांच्या सूचनेप्रमाणे त्याचे नाम आपल्या जिभेवर सतत घोळत राहिले पाहिजे. तसे न करता आपण जर अन्य भरीस पडलो तर आपली इच्छा सफल होणार नाही. याकरिता नामस्मरण, भजन आणि वाचन या त्रिकुटात मनाला अडकवून टाकावे म्हणजे सहजच मन ताब्यात येईल आणि तेणेकरून जन्माचे सार्थक होईल. नाम हे भवरोगावरील रामबाण औषध आहे. सध्या कलियुगाचा शेवट जवळ आल्यामुळे माणसांची वृत्ति विषयात अतिशय गढून गेली आहे. महागाईमुळे पैसा कितीही असला तरी संसाराला पुरत नाही. म्हणून मनःस्थिति बिघडत चालली आहे. अंगातील शक्तीचे व आयुष्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे दान, धर्म, व्रते, मोठमोठे नेम यथासांग कर्म हातून घडले नाही तर फलप्राप्ती नाही. त्यापेक्षा ज्या नियमाला खर्च नाही, त्रास नाही, अत्यंत सुलभ व सोपे असून सत्वर व अमोघ लाभ देणारे असे जे प्रभूचे नाम ते जास्तित जास्त किती झेपेल तितके जपण्याचा नेम करावा. रोग बरा होण्याकरिता जसे पथ्य सांभाळावे लागते त्याप्रमाणे भवरोगनिवाणार्थही पथ्य सांभाळले पाहिजे. ते म्हणजे - खोटे बोलायचे नाही, दुसऱ्याचे मन दुखवावयाचे नाही, कुणाचे वाईट झालेले ऐकून आनंद मानावयाचा नाही, कपटाने वागायचे नाही, कोणालाहि फसवायचे नाही.
कलावती आईंनी, मुलांना कशा प्रकारे वळण लावावे, शेजारीपाजारी, नोकरचाकर ह्यांच्याशी वागणूक कशी असावी, काटकसर कशी करावी, स्वछता कशी ठेवावी, वेळ फुकट न घालवता योग्य कारणी कसा लावावा, स्त्रियांनी घरातल्या मंडळींची मने कशी काय सांभाळावी - त्यांच्यावर घरातील सर्व जबाबदारी असल्यामुळे त्या जर योग्य तऱ्हेने वागल्या तर घराला वळण रहाते. प्रेमाने, आपुलकीने वागून त्या दुष्टांना सुष्ट करू शकतात. मुलांना योग्य वळण लावू शकतात - हे आम्हाला प्रत्यक्ष आपल्या आचरणाने दाखवून दिले आहे.
|| परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता ||
Image result for kalavati aai balopasana


No comments:

Post a Comment