🌼🌼🌼स्वामी विवेकानंद 🌼🌼🌼
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली.
*नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.
*जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते.
*नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून
घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’

🌼 "हातातील कार्य अत्यंत आवडते असल्यास एखादा महामूर्ख देखील ते पार पाडू शकतो; परंतु खरा बुद्धिमान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देऊ शकतो की जे त्याच्या आवडीचे होऊन जाते. कोणतेही कार्य क्षुद्र नाही हे ध्यानात ठेवा."
🌼 "जर तुम्ही कोणाही विषयी द्वेष व असूया भाव प्रकट केला तर तो चक्रवाढ व्याजनिशी तुमचाकडे परत येईल. कोणतीही शक्ती याचा प्रतिकार करू शकत नाही. एकदा एकदा तुम्ही त्याना चालना दिली की त्यांचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल हे लक्षात ठेवल्यास तुमचा हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत."
🌼 कोणतेही कर्म क्षुद्र नाही. ह्या जगातील प्रत्येक गोष्ट वटबीजासारखी आहे. वटबीज एखाद्या मोहरी सारखे अगदी लहान दिसते, पण महान वटवृक्ष त्यात अव्यक्त रुपात वसत असतो. हे ज्याच्या लक्षात येते आणि सगळ्या प्रकारच्या कार्यांना जो खऱ्या अर्थाने थोर बनवितो तोच खरोखर बुद्धिमान पुरुष होय.
🌼 मूळ जन्मल्याबरोबर त्यावर घातल्या जाणाऱ्या नियंत्रणा विरुध्द बंड करू लागते. त्याचा पहिला शब्द रडण्याचा असतो, आणि हे रडणे, ज्या बंधनात ते सापडलेले असते त्याविरुध्द असते. मानवाच्या या स्वाधीनतेच्या आकांक्षेतून पूर्णपणे स्वाधीन अशा एका पुरुषाची कल्पना उद्भवते. ईश्वराची कल्पना ही मानवी स्वभावाचे एक मूलभूत अंगच आहे. वेदांतानुसार, मानवी मनाला आकलनीय अशा ईश्वरविषयक कल्पनांमध्ये सर्वश्रेष्ठ कल्पना सत-चित- आनंद ही आहे.
🌼 आपण या जगातील सुखाची वाढ करू शकत नाही, किंवा त्यातील दु:खातही भर घालू शकत नाही. जगातील व्यक्त शक्तींची गोळाबेरीज नेहमी सारखीच राहणार. आपण तिला केवळ इकडून तिकडे आणि तिकडून इकडे ढकलत असतो, इतकेच. परंतु ती नेहमी समानच राहील, कारण असे राहणे हा मुळी तिचा गुणधर्म होय. ही भरती आणि ओहोटी, हा चढउतार मुळी जगाचा स्वभावाच होय. वस्तुस्थिती अशी नाही, असे म्हणणे म्हणजे मृत्युशून्य जीवन असू शकते म्हणण्यासारखेच तर्कविसंगत आहे. मृत्युशून्य जीवन जर खरोखरीच अस्तित्वात येऊ शकेल तरच आपण उत्थानाला पतनाहून अलग करू शकू
🌼 जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती आणि अत्यंत निष्कपटता हे गुण असतातच, आणि ह्या गुणांमुळेच त्याला जीवनात अपूर्व यश प्राप्त होत असते. तो पूर्णपणे नि:स्वार्थी कदाचित नसेलही, पण तो नि:स्वार्थ होण्याच्या मार्गाला निश्चितच लागलेला असतो. जर तो संपूर्णपणे नि:स्वार्थी असता तर त्याला लाभलेले यश हे बुद्धदेवांना वा येशू ख्रिस्ताना मिळालेल्या यशाइतकेच महान ठरले असते. तुम्ही किती नि:स्वार्थी आहात ह्यावरून तुम्ही किती यशस्वी होणार हे ठरत असते.
🌼 " तुमच्या पाठीशी लोक किती मोठ्या संख्येने आहेत याचे महत्व नाही. ते गरीब आहेत की श्रीमंत याचेही महत्व नाही. मनसा-वाचा-कर्माण जर त्यांच्यात ऐक्य असेल तर असे मुठभर लोकसुद्धा सगळे जग उलथेपालथे करू शकतात, ही श्रद्धा हृदयात सतत बाळगा, तिचा कधीही विसर पडू देऊ नका. होऊ द्या विरोध - जितका विरोध होईल तितका चांगला. अडथळा आल्याशिवाय का नदीला वेग प्राप्त होतो? गोष्ट जितकी नूतन आणि श्रेष्ठ असेल तितका तिला प्रारंभी अधिक विरोध होणारच. आपल्याला शेवटी यश नक्की मिळणार हेच हा विरोध सांगत आहे."
🌼 निंदेचा शब्द उच्चारू नका, ओठ बंध ठेवा व हृदयाची कापटे उघडा. मातृभूमीच्या व अखिल जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा; आणि हे करीत असताना सर्व जबाबदारी आपल्याच शिरावर आहे अशी धारणा असू द्या. वेदांताचा हा प्रकाश व जीवनादर्श घरोघरी पोहोचवा व प्रत्येक जीवातील ईश्वरत्व जागृत करा.
🌼 जर बुद्धी आणि हृदय यांच्यात विरोध निर्माण झाला तर तुम्ही हृदयाला अनुसरून वागा. कारण बुद्धीचे कार्य तर्कविचार हे आहे. तर्कविचाराच्या क्षेत्रापलीकडे बुद्धी जाऊ शकत नाही. बुद्धीला ज्या ठिकाणी जाता येत नाही अशा उच्च पातळीवर हृदयच आपल्याला घेऊन जाते. ते बुद्धीच्या पलीकडे जाते आणि जिला 'स्फूर्ती' असे म्हणतात तिच्याप्रत हे जाऊन पोहोचते. हृदयवान माणसांना हे लोणी मिळते आणि बुद्धिमान माणसाच्या वाट्याला फक्त ताकच येते.
🌼 खंबीरपणे उभे रहा. धैर्यवान व्हा. सर्व दायित्व स्वत:च्या खांद्यावर घ्या आणि जाणून असा की, तुम्हीच तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. तुम्हाला आवश्यक असलेले सर्व सामर्थ्य आणि सहाय्य तुमच्या ठायीच विद्यमान आहे. लक्षात ठेवा, तुम्ही उच्चारलेला प्रत्येक शब्द, केलेला प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृत्य हे तुमचे कर्मसंचित घडवीत असतो. दुष्ट विचार आणि दुष्ट कृती ह्या जशा तुमच्यावर वाघासारख्या झडप घालायला टपलेल्या असतात तसेच तुमचे शुभ विचार आणि तुमची शुभ कृत्ये हजारो लाखो देवदूतांची शक्ती धारण करून तुम्हाला सामर्थ्य देण्यासाठी, तुमचे रक्षण करण्यासाठी सदैव सिद्ध असतात.
🌼 ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि नि:स्वार्थवृत्ती या तीन गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधार्थ उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल.
🌼 स्त्रीपूजनानेच सारे समाज थोर पदवीला पोहोचले आहेत. ज्या देशात, ज्या समाजात हे स्त्रीपूजन नाही तो देश, तो समाज कधीही मोठा होऊ शकलेला नाही व पुढे कधी काळी होणे शक्यही नाही. तुमच्या साऱ्याच्या साऱ्या समाजाचा जो हा अध:पात झाला आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे या शक्तिरुपिणी स्त्रियांची अवहेलना हेच होय.अमूक एक व्यक्ती ही स्त्री आहे आणि अमूक एक व्यक्ती ही पुरुष आहे असा विचारच आपण करता कामा नये. आपण सारी माणसे आहोत आणि ऐकमेकांना सहाय्य करण्यासाठी, एकमेकांशी स्नेहाने वागण्यासाठी आपला जन्म झाला आहे.
🌼 वसायिक तत्वे आपल्यामध्ये चांगली मुरलेली नाहीत. एका कामासाठी आलेले पैसे भुकेने मरायची वेळ आली तरी दुसऱ्या कामाला वापरता कामा नयेत. व्यवसाय हा व्यवसाय आहे. तो काही दोस्तीखातर केलेला व्यवहार नव्हे. आपल्या ताब्यात असलेल्या वस्तूंचा प्रत्येकाने चोख हिशोब ठेवला पाहिजे. ही व्यवसायिक नीती आहे.
🌼 प्रत्येकच काम पवित्र आहे आणि स्वीकृत कार्यावर निष्ठा ठेऊन ते करणे ही श्रेष्ठ प्रकारची पूजा होय. आपल्यासमोर जे कर्तव्य दिसत असेल, आपल्या हातात जे काम असेल ते निष्ठने केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य प्राप्त होते. अशा रीतीने आपली शक्ती वाढत गेली तर जीवनात आणि समाजात जे अत्यंत सन्मानीय समजले जाते असे दायित्व आपल्यावर सोपविले जाऊ शकेल."
🌼 आपले मज्जातंतू शक्तीसंपन्न करा. आपल्याला लोखंडी स्नायू व पोलादी मज्जातंतू हवे आहेत. आपण पुष्कळ दिवस रडलो. आता रडणे पुरे, आता आपल्या पायावर उभे राहा व मनुष्य बना.
🌼 मी जितका मोठा होऊ शकलो असतो त्याच्या शंभरपट मोठे माझया सर्व मुलांनी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण अचाट कर्मे करणारा झाला पाहिजे - झालाच पाहिजे असे मी म्हणतो. आज्ञाधारकपणा, तत्परता आणि प्रेम या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर मग कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकणार नाही.
🌼 हे जीवन म्हणजे तुम्हाला लाभलेली एक अपूर्व संधी होय, अपूर्व सुयोग होय. तो टाकून देऊन तुम्ही ऐहिक सुखांच्या मागे लागणार काय? प्रभूच सर्व सुखांचा झरा होय. त्याच परमश्रेष्ठाचा शोध करा, तोच तुमच्या जीवनाचे लक्ष्य होऊ द्या, मग त्याचा तुम्हाला निश्चित लाभ होईल यात शंका नाही.
🌼 संप्रदाय वा संघटना यांना असलेला मोठा अभिशाप असा की, त्यात एखाद्याचे मत जरा वेगळे पडले की, तो ताबडतोब आपला स्वतंत्र पंथ काढतो, त्याला वाट पाहण्याइतका धीर नसतो. म्हणून तुमच्या संघाविषयी तुम्हाला परम आदर असला पाहिजे. येथे अवज्ञेला जागाच नाही. येथे कोणीही विश्वासघातकी असता कामा नये.
🌼 कोणी एखादी कल्पना सुचवली तर ती झिडकारून टाकू नका. एकमेकांवर सतत टीका करीत राहिल्यानेच सर्व अनर्थ ओढावला आहे. संघटना फुटतात त्या याच कारणामुळे!
🌼 प्रत्येकालाच वाटते की आपण नेता व्हावे. आज्ञापालनाची कोणाचीही तयारी नसते. मोठमोठी कार्ये करीत असताना नेत्यांच्या आज्ञा निष्ठेने पाळल्या पाहिजेत. लोक-हितासाठी आपल्याला केल्या गेलेल्या आज्ञेचे जो यात्किंचितही कुरकुर न करता पालन करतो तोच खरोखर नेता होऊ शकतो.
- स्वामी विवेकानंद
No comments:
Post a Comment