Tuesday, 9 August 2016

🌼🌼🌼काम करा हो काम करा ! (बालसंस्कार)🌼🌼🌼

एकदा चिंटू आईवर रागावला आणि गेला बागेत स्वतःशीच बडबडत , ' आई सारखं हे कर , ते कर .... ' असं बडबडत असताना त्याला दिसली एक चिऊताई . आपल्या इवल्याशा चोचीने एक - एक दाणा टिपत होती . मध्येच खेळणारी मुलं जवळ आली की , ती उडून जायची अन् मुलं गेल्यावर परत यायची . पुन्हा - पुन्हा तिचे असेच चालू होते . तिला पाहून चिंटूला प्रश्न पडला , ' ही कशी नाही कंटाळत तेच - तेच करायला ? ' पुढे त्याला दिसली एक मधमाशी . तिचेही तेच सारखं फुलांवर बसायचं , मग पोळ्याकडे जायचं ...
एका झाडाच्या फांदीवर सतत एक एक काडी आणत खोपा बांधणारी सुगरणही त्याला दिसली . वारुळातल्या मुंग्यांची सतत कार्यरत दिसल्या . चिंटूने स्वतःशीच विचार केला , ' हे सगळे आपल्या कामाबद्दल कुठेच तक्रार करत नाहीत , मग आपण का असे ....?'आणि त्या क्षणी त्याने निश्चय केला , ' आजपासून मी माझे कामे नीट करेन अन् आईचेदेखील ऐकेन ?'
मुलांनो , *काम करणे ही एक निसर्गदत्त योजना आहे.*निसर्गातला प्रत्येक घटक सतत कार्यरत असतो . सुर्याचे सतत प्रकाश अन् उष्णता देणे , नद्यांचे सतत वाहणे , वनस्पतींची अन्ननिर्मिती , पृथ्वीचे परिवलन परिभ्रमण ... ही कामे अविरतपणे चालू आहेत , म्हणून ' विश्व ' नावाचा रथ पुढे - पुढे चाललेला आहे .
माणूसही त्या निसर्गाचा अविभाज्य घटक , म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला काम हे करावेच लागते . मोठ्या माणसांना बोलताना आपण ऐकतो , ' काय करणार पोटासाठी काम करावे लागत बाबा !' पण मुलांनो खरी गंमत ही आहे की , माणसाने काम करावे , म्हणून त्याला निसर्गाकडून पोट मिळालेले आहे . विचार करा बरे , पोटच नसते तर माणसाने काम केले असते का ?....नाही !
म्हणून पोटासाठी काम नसून कामासाठी पोट आहे हे लक्षात घ्या . म्हणजे कामापासून सुटका नाही . त्यामुळे मोठी माणसे नोकरी - धंदा करतात , घर सांभाळतात , मग या वयात तुमच्या वाट्याला आलेले काम कोणते बरे ? ' अभ्यास ' ... या वयात मुलांनी अभ्यास करायला हवा . कारण भावी जीवनातील यशासाठी , सुख , समृद्धीसाठी आवश्यक ज्ञान हे अभ्यासातून मिळत असते आणि या अभ्यासामुळे तुमचीच नव्हे , तर तुमच्या कुटुंबाची , तुमच्या समाजाची अन् आपल्या राष्ट्राचीदेखील प्रगती होत असते ,
जीवनविद्या सांगते , ' ज्याला अभ्यासाचा कंटाळा , त्याच्या भाग्याला टाळा .'त्यामुळेच आपल्या वाट्याला आलेले काम रडत - खडत करण्यापेक्षा ते आवडीने , प्रामाणिकपणे अन् आनंदान करणे यातच खरे शहाणपण आहे .
म्हणून जीवनविद्येच्या शब्दात सांगावस वाटते , ' काम करा हो काम करा , कामावरती प्रेम करा . काम करा अन् पोट भरा निसर्ग नियम हाच खरा . जीवनविद्येचा बोध स्मरा , उद्योगाची हा योग खरा , राष्ट्राला समृद्ध करा , राष्ट्रामध्ये देव पाहा .'
------ आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै.
(जीवनविद्या मिशन)

No comments:

Post a Comment