Tuesday, 7 March 2017

जागतिक महिला दिन !
आम्ही विद्येची देवता सरस्वती देवीला वंदन करतो, दुर्गे दुर्गट भारी म्हणत हात पसरून 'आई तुज वाचोन कोण पुरवील आशा' अशी आर्त हाक घालून त्या जगजननी समोर मनाची घालमेल व्यक्त करतो, अडचणीत येऊ नये म्हणून 'संकट निवारी' अशी विनवणी तिला आपण करत असतो... धातुच्या नाण्याला, कागदाच्या पैशाला लक्ष्मी देवो भव: म्हणत हळद कुंकू फुल आपण अर्पण करत असतो.. नवरात्रातील तिच्या नऊ रुपांचा जागर घराघरात चाललेला असतो..
🙏🏻🙏🏻🌷
या पृथ्वीला आम्ही धरणी माता ( Mother Earth )तर आमच्या देशाला सुद्धा आम्ही 'भारत माता' म्हणून संबोधतो. या देशा मध्ये अगदी पुराणकाळापासून ते आज पर्यंत असंख्य महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजाला योग्य दिशा देण्याचे अद्भुत कार्य त्या त्या काळात केलेलं आहे, प्रसंगी दुष्टं प्रवृत्तींशी दोन हात करत समाजाचे रक्षण करण्याचे धीरोदात्त कर्तव्य सुद्धा आमच्या माता भगिनींनी बजावलेलं आहे.

जगामध्ये अशा असंख्य, अज्ञात महिला आज हि आहेत कि ज्या स्वत: वातीच्या भुमिकेत राहून 'सर्वेsपि सुखिन: सन्तू' म्हणत लोकोद्धारासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी त्या सदैव जळत आहेत.
🌷🌷
जिजाऊ आऊसाहेब, राणी चेन्नम्मा, पद्मिनी, येसुराणी साहेब, महाराणी ताराबाई, आहिल्याबाई होळकर, झाशीची रणरागिणी राणी लक्ष्मी बाई, आनंदीबाई जोशी (पहिल्या महिला डाॅक्टर), सरोजिनी नायडू, मादाम कामा, भगिनी निवेदिता, सावित्रीबाई फुले ,मदर टेरेसा,अशा अनेक कर्तृत्ववान स्त्री व्यक्तीरेखा ज्यांनी ख-या अर्थानी इतिहास घडविला, समाजाला जगण्यासाठी प्रेरणा दिली.. देशाचे नाव उज्वल केलं!
🌷🌷

पुढच्या पिढीतील लतादिदी, आशा भोसले, इंदिरा गांधी, कल्पना चावला, आताच्या सुनिता विल्यम्स अशी अनेक नावं आज आहेत की जगभरात या व्यक्तीरेखांचा उल्लेख अतिशय आदरानी केला जातो याबद्दल प्रत्येक भारतीयाला यांचा निश्चितच अभिमान वाटतो आहे.
🌷🌷

अशा थोर स्त्री व्यक्तीरेखांचे स्मरण केवळ आजच नाही तर सतत, सदैव आपण केलं पाहिजे, यांचा इतिहास जपला पाहिजे व पुढील पिढीला मार्गदर्शक असा हा अमुल्य ठेवा आपल्याला हस्तांतरीत करता आला पाहिजे.
🌷🌷
फुला पानांमध्ये, लता वेलींमध्ये, नद्यांना सुद्धा सिंधु, कावेरी, गंगा, नर्मदा, कृष्णा, यमुना अशी नावं आम्ही दिली त्या सर्व नद्यांमध्ये, देव्हा-याध्ये, मनाच्या एका हळव्याशा कोप-या मध्ये, इतकंच काय तर या चराचर सृष्टीच्या प्रत्येक घटकामध्ये तुझं साैंदर्य, तुझं अस्तित्व अबाधित आहे आणि ते असंच चिरंतन राहो हिच खरी स्रीशक्तीला शुभकामना ..🌷

No comments:

Post a Comment