🌼🌼🌼॥...संस्कार करताय मुलांवर ?..॥🌼🌼🌼
-डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. सुखदा चिमोटे
आपल्या मुलांना आपणच 'ओळखतो' प्रत्येक मूल वेगळं, त्याची अभ्यासाची शैली वेगळी आणि त्याला त्याच्या पालकांशिवाय कोणीही तितकंसं चांगलं ओळखत नसतं. म्हणूनच त्यावर उत्तरही पालकच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं शोधू शकतात. आपण कोणीही आदर्श पालक नसतो. हळूहळू चुकांमधून शिकतच पुढे गेले पाहिजे. 'मारा डुबकी आपल्या लहानपणात. पालकत्व हे काही आव्हान नाही, तर एक निखळ, निर्मळ आनंद देणारी प्रक्रिया आहे. तेव्हा त्यातील कोणत्याही प्रश्नाला महाभयंकर रूप देणं टाळावं, तसेच फार क्षुल्लकदेखील समजू नये.
मुलांचं असं वागणं कदाचित एखाद्या विशिष्ट काळापर्यंत मर्यादित राहून पुढे बदलूदेखील शकतं. त्यामुळेच पालकांनी सर्वप्रथम संयम ठेवायला शिकलं पाहिजे. स्वत:च्या लहानपणात एक डुबकी मारून आलो तर बरेचसे प्रश्न हे प्रश्नच राहणार नाहीत. आपलं बालपण आठवलं की मुलांच्या भावना ओळखणं सोपं जातं. भावनिक साक्षरता आली की, संवाद साधणं सोपं होतं. पालक-पाल्य यांच्यामध्येच सुसंवाद असला की समस्या सहज सोडवता येतात. पण अर्थात सुसंवाद म्हणजे आपण बोलणं व मुलांनी ऐकणं नाही तर पाल्यांचंही ऐकून घेणं, समजून घेणं व त्याप्रमाणे वागणंदेखील! 'आज काहीतरी बिनसलंय. मूल शाळेतून आलं की त्याच्या दप्तर फेकण्याच्या पद्धतीवरूनच आज त्याचं काहीतरी बिनसलं आहे हे लक्षात यायला हवं आणि मग अशा वेळी पालकांनी याआधी दप्तर जागेवर ठेव, फेकलंस कशाला? हा हट्टीपणा सोडून आधी त्याला काय म्हणायचंय हे समजून घेतलं पाहिजे. त्याची त्या-त्या वेळेची गरज ओळखली की मग त्याच्याशी संवाद छान साधता येऊ शकेल.
'देण्यातला आनंद म्हणजे संस्कार 'मर्यादित मी' कडून 'विशाल मी' बनण्याचा प्रयत्न म्हणजे संस्कार. इतरांचा विचार करायला शिकणं, स्वार्थी दृष्टिकोन बाजूला ठेवणं म्हणजे 'विशाल मी' बनवणं होय. नम्रता, कृतज्ञता, क्षमा, करुणा, आनंद, तन्मयता या भावनांचा अनुभव पालकांनी स्वत: घेणं व तो घेत असताना मुलांना त्यात सहभागी करून घेणं म्हणजे संस्कार. इतरांना देण्यातला, आनंदी करण्याचा अनुभव मुलांना दिला की, त्याला खरा संस्कार म्हणता येईल. तुम्हीच मुलांचे रोल मॉडेल.
संस्काराच्या व्याख्या काळानुसार बदलत आहेत. फक्ता 'शुभं करोति म्हणणं' म्हणजे संस्कार नव्हे. संस्कार करण्याचा बागुलबुवा करू नये. पालकच मुलांचे पहिले रोल मॉडेल असल्यानं पालकांच्या योग्य वर्तनातून संस्कार आपोआपच घडत जातात. त्यामुळे आपलं वागणं योग्य असेल तर चांगले संस्कार आपोआपच घडत जातील.
''आमच्यावेळी असं नव्हतं!.' मुलं हट्टीपणा करतात, आपल्या म्हणण्यानुसारच सर्व गोष्टी व्हाव्यात, असा आग्रह धरतात.अशावेळी पालकांनी 'आमच्या लहानपणी असं नव्हतं' हा विचार अगोदर बाजूला ठेवावा. कारण आता आजूबाजूची परिस्थिती आमूलाग्र बदललेली आहे. मुलांवर माध्यमाद्वारे होणार्या संवेदनांच्या भडिमारामुळे त्यांचा 'अहं' फारच लवकर जागृत होतो. माध्यमाद्वारे त्यांना हव्या - नको त्या सर्व माहितीचा भडिमार त्यांच्यावर सतत होत असतो. अशा वेळी पालकांकडून मुलांना माहितीपेक्षा शहाणपण, संवेदना, सद्सद्विवेक बुद्धी मिळावी जी त्यांना माध्यमं देऊ शकत नाहीत. संगणक, मोबाइल, फेसबुक यापासून मुलांना लांब ठेवण्यापेक्षा आपणही त्यांचा वापर संवादाचं माध्यम म्हणून करून घेतला तर नक्कीच उपयुक्त ठरेल.
'ठेवा खाली ते अपेक्षांचं बोचकं! मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्वगुण कसे विकसित करावेत यावर पालक फारच हातघाईला येतात. खरं म्हणजे प्रत्येक मूल चांगला वक्ता झालाच पाहिजे ही अपेक्षाच मुळी चुकीची आहे. प्रत्येक क्षेत्रात अंतर्मुख (इंट्रोव्हर्ट) व बहिर्मुख (एक्स्ट्रोव्हर्ट) असे दोन्ही प्रकारचे लोक आवश्यक असतात व ते दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे मुलांना जे आवडतं ते करू द्यावं, सतत त्यांच्यावर आपल्या अपेक्षा लादू नयेत.
'मोठय़ांचा अनादर आणि 'डे ड्रिमिंग.' किशोरवयीन मुलं अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाहीत. मोठय़ांशी अनादरानं वागतात. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये 'दिवास्वप्ना'चं (डे ड्रिमिंग) प्रमाण वाढल्यासारखं दिसतं. ही अनेक पालकांची अडचण असते, पण यात नैसर्गिक भागही आहे. मुलींपेक्षा मुलांमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची ऊर्मी थोडी उशिरा येते. त्यामुळे बर्याचदा या वयात मुली अभ्यास जास्त गांभीर्यानं घेताना दिसतात. स्वत:ला सिद्ध करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात निर्माण व्हावी म्हणून त्यांच्यासमोर कमी वयाची रोल मॉडेल्स ठेवली, तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. त्याच्याशी संवाद साधत त्यांची आवड लक्षात घेतली, त्या क्षेत्रातील यशस्वी झालेल्या व्यक्तीशी परिचय करून दिल्यास ध्येयाकडे जाण्याची त्यांना योग्य दिशा मिळू शकेल.
'कबूल करा. चुकलो!'
पालकांंविषयी मुलांना आदर नाही, असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण बदलत्या काळानुसार आदराची व्याख्याही तपासून पाहायला शिकलं पाहिजे. 'भीतीयुक्त आदर' वा 'आदरयुक्त भीती' या कल्पना मागे पडल्या आहेत. धाकापेक्षा मैत्रीची भावना असावी, अशी आता मुलांची व काही पालकांची अपेक्षा असते. आदर फक्त आदरार्थी बोलण्यातून दिसून येतो, असं नाही. तर वेळप्रसंगी तो त्यांच्या वागण्यातूनच लक्षात येतो. पालकांनी स्वत:च्या चुका लपवून न ठेवता प्रांजळपणे कबूल केल्यास मुलांना आदर वाटतो.
पालकांंविषयी मुलांना आदर नाही, असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण बदलत्या काळानुसार आदराची व्याख्याही तपासून पाहायला शिकलं पाहिजे. 'भीतीयुक्त आदर' वा 'आदरयुक्त भीती' या कल्पना मागे पडल्या आहेत. धाकापेक्षा मैत्रीची भावना असावी, अशी आता मुलांची व काही पालकांची अपेक्षा असते. आदर फक्त आदरार्थी बोलण्यातून दिसून येतो, असं नाही. तर वेळप्रसंगी तो त्यांच्या वागण्यातूनच लक्षात येतो. पालकांनी स्वत:च्या चुका लपवून न ठेवता प्रांजळपणे कबूल केल्यास मुलांना आदर वाटतो.
''शिक्के' मारणं बंद करा, प्रश्न आपोआप सुटतील.'
मुलांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्याला मुलांचं जे वागणं आवडत नसेल ते नेमकेपणानं सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर मूर्ख, बावळट, बेशिस्त असे शिक्के न मारता 'मला तुझं अमुक वर्तन आवडलं नाही,' असं सांगणं जास्त परिणामकारक ठरते. खरं म्हणजे बर्याच प्रश्नांचं मूळ पालक व पाल्य विसंवादातच आहे. एकदा पालकांमध्ये भावनिक साक्षरता आली तर मुलांशी त्यांच्या वाढीच्या टप्प्यावर संवाद साधता येऊ शकेल व बरेचसे प्रश्न आपोआपच सुटतील.
मुलांचं वर्तन सुधारण्यासाठी आपल्याला मुलांचं जे वागणं आवडत नसेल ते नेमकेपणानं सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर मूर्ख, बावळट, बेशिस्त असे शिक्के न मारता 'मला तुझं अमुक वर्तन आवडलं नाही,' असं सांगणं जास्त परिणामकारक ठरते. खरं म्हणजे बर्याच प्रश्नांचं मूळ पालक व पाल्य विसंवादातच आहे. एकदा पालकांमध्ये भावनिक साक्षरता आली तर मुलांशी त्यांच्या वाढीच्या टप्प्यावर संवाद साधता येऊ शकेल व बरेचसे प्रश्न आपोआपच सुटतील.
No comments:
Post a Comment