Tuesday, 14 March 2017

🌼🌼🌼नियंत्रण रागावर…🌼🌼🌼

एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा.

एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा.
पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले.
पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे.
एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला एकदाही राग आला नाही  आणि खिळा ठोकण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की आता तू राग आवरलास की प्रत्येकवेळी तिथला एक खिळा काढायचा.
मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके दिवशी तेथे एकही खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब वडिलांना सांगितली. रागावर नियंत्रण ठेवण्याच्या गुणाचे वडिलांनी कौतुक केले.
मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी वडील त्याला घेऊन त्या भिंतीपाशी गेले. त्याला म्हणाले,
“हे बघ, तू रागावर नियंत्रण मिळवलेस, ही गोष्ट चांगलीच आहे. पण, बघ भिंतीवरील ही भोके तशीच राहणार आहेत. आपण रागात काहीतरी बोलून जातो आणि दुसऱ्याच्या मनावर असेच ओरखडे उठतात. नंतर शांत झाल्यावर आपल्याला चूक कळते.  पण दुसऱ्याच्या मनावरील ओरखडे तसेच राहतात. तू भिंतीवरील खिळे काढलेस पण दुसऱ्याच्या मनावर झालेले ओरखडे कसे मिटवणार?”
“लक्षात ठेव, रागाच्या भरात कधीही दुसऱ्याला बोलू नकोस, जेणेकरून राग विरल्यावर तुला खेद व्यक्त करावा लागेल.”

No comments:

Post a Comment