Wednesday, 1 February 2017

🌼🌼🌼नारायण मूर्ती काय म्हणाले? 🌼🌼🌼


 भारतातील आयआयटी आणि आयआयएससी (भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था) यांनी गेल्या सहा दशकांमध्ये देशाला काय योगदान दिले, असा परखड सवाल इन्फोसिसचे मानद अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी केला. त्यामुळे भारतातील उच्च शिक्षण संस्थांच्या कामगिरीविषयी ठळक प्रश्नचिन्ह उभे राहिले. परंतु वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या बातम्या या मूर्तींनी बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेत (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) केलेल्या भाषणातील केवळ एक भाग होत्या आणि एक बोचरी सुरवात होती. त्यांनी या संस्थेतील पदवीप्रदान समारंभात 16 जुलै 2015 रोजी केलेल्या भाषणाचा हा सारांश... 

नारायण मूर्ती यांचे भाषण 

भारतीय विज्ञान संस्थेने मला इथे विचार मांडण्यासाठी बोलावले हा माझा मोठा सन्मानच आहे. इथून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आनंदात मी सहभागी आहे. भारतीय विज्ञान संस्थेसारख्या आपल्या देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी भारताच्या घडणीत कोणती भूमिका बजावू शकतात आणि हे जग आणखी सुंदर करण्यासाठी काय करू शकतात यासंबंधीचे विचार मी आज मांडणार आहे. 

विज्ञान हे निसर्गातील रहस्यांचा उलगडा करते आणि अभियांत्रिकी अशा शोधांचा मानवी जीवन आणखी चांगले करण्यासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी प्रयत्न करते. भारतीय विज्ञान संस्था ही देशातली आघाडीची संस्था आहे. जगातील स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेले अनेक विद्यार्थी या संस्थेने घडवले आहेत. इथल्या संशोधनाची दखलही विविध शोधनिबंधांमध्ये घेण्यात आलेली आहे. देशाच्या विकासात आणि परिवर्तनात या संस्थेची भूमिका निश्‍चितच महत्त्वाची मानली जाते. 

नव्या कल्पना व शोध 
काही महिन्यांपूर्वी मी अमेरिकेतल्या केंब्रिज मॅसॅच्युसेट्‌स इथे गेलो होतो. तिथे मला "फ्रॉम आयडियाज्‌ टू इन्व्हेन्शन्स ः 101 गिफ्ट्‌स फ्रॉम एमआयटी टू द वर्ल्ड' हे पुस्तक भेट देण्यात आले. मॅसॅच्युसेट्‌स तंत्रज्ञान संस्थेतील (एमआयटी) विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षकांनी केलेल्या महत्त्वपूर्ण शोधांची आणि त्यांनी जगात घडवलेल्या बदलांची थोडक्‍यात यादी त्यात आहे. या संस्थेने गेल्या पन्नास वर्षांत केलेल्या संशोधनातील फक्त दहा शोधांची नावे मी इथे वाचून दाखवतो. 
1. इव्हान गेटिंग आणि ब्रॅड पार्किन्सन ः ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम 
2. ह्युज हेर ः बायॉनिक प्रोस्थेसिस 
3. रॉबर्ट नॉइस ः मायक्रोचिप 
4. रे टॉमलिन्सन ः ईमेल 
5. रॉबर्ट लॅंगर ः मानवी ऊतींपर्यंत औषधे योग्य रीतीने व वेगाने पोचण्यासाठीची पद्धती आणि त्याच्याशी निगडित पॉलिमर 
6. रोनाल्ड रिव्हेस्ट, ऍडी शामिर आणि लिओनार्ड अडेल्मा ः आरएसए एन्‌क्रिप्शन 
7. रे कुर्झवेल ः टेक्‍स्ट/स्पीच रेकग्निशन (व्यक्तीचा आवाज ओळखण्याची आणि आवाजाचे अक्षरांमध्ये व अक्षरांचे आवाजात रूपांतर करण्याची सुविधा) 
8. शिंतारो असानो ः फॅक्‍स यंत्र 
9. अँड्य्रू व्हिटेरबी ः व्हिटेरबी अल्गॉरिदम 
10. नॉर्बर्ट वेनर ः सायबरनेटिक्‍स 

ही यादी केवळ वानगीदाखल दिली आहे. एमआयटीतले विद्यार्थी आणि शिक्षकांनी वेगळ्या वाटांनी जाण्याचे साहस केले. वेगळे आणि तोवर उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांचा मागोवा घेतला. संशोधनाच्या क्षेत्रात हनुमान उडी घेण्यासाठी बुद्धीचा वापर केला आणि बाह्यतः अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी शक्‍य करून दाखवण्याचे धैर्य दाखवले. त्यामुळेच असे यश त्यांना मिळवता आले. पाश्‍चात्य देशांमधील अनेक उच्च शिक्षण संस्थांमधील यशाच्या कथाही अशाच आहेत. विजेवर चालणारे दिवे, मोटारी, नभोवाणी, दूरचित्रवाणी, संगणक, इंटरनेट, एमआरआय व अल्ट्रासाउंड स्कॅनर, शीतकरण यंत्रणा, लेसर, यंत्रमानव आणि इतर अनेक प्रकारची उपकरणे व तंत्रज्ञान या संस्थांमध्ये विकसित झाले. या सुविधांमुळे आपले जगणे आणखी सुखकर झाले आहे. आपले आरोग्य सुधारले आहे आणि आपली कार्यशक्तीही वाढली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर आपल्या देशातील उच्च शिक्षण संस्थांचा थोडा विचार करा. आपला समाज आणि जग आणखी चांगले होण्यासाठी भारतातील तंत्रज्ञान आणि विज्ञान संस्थांनी गेल्या साठ वर्षांमध्ये काय योगदान दिले याचा विचार करा. जगातील घराघरात ज्याचे नाव झाले आहे असे एक तरी उपकरण भारतात तयार झाले का? संपूर्ण जगाला आनंद होईल असा एक तरी क्रांतिकारक शोध भारतात लागला का? मित्रांनो, वस्तुस्थिती ही आहे की असे कोणतेही योगदान भारताने गेल्या साठ वर्षांमध्ये जगाला दिलेले नाही. या काळात जागतिक कंपन्यांची उत्पादनक्षमता वाढण्यासाठी उपकारक ठरलेल्या केवळ दोन कल्पना आपण दिल्या- ग्लोबल डिलिव्हरी मॉडेल आणि चोवीस तासांचा कामाचा दिवस. या दोन्ही कल्पना "इन्फोसिस'ने जगाला दिल्या. 

समस्यांचा अंधार आणि आशेचे किरण 
जरा आपल्या देशातील समस्यांवर एक नजर टाका. जगातील सर्वाधिक निरक्षर व अशिक्षित लोकसंख्या आपल्याकडे आहे. सर्वाधिक कुपोषित बालके आपल्या देशात आहेत. जगातील सर्वांत वाईट सार्वजनिक आरोग्य सेवा आपली आहे. सर्वाधिक प्रदूषित नद्या आपल्या आहेत. दर वाहनातून सोडल्या जाणाऱ्या कार्बनच्या धुराचे प्रमाण जास्त असलेली वाहने आपल्याकडे तयार होतात. दरडोई शुद्ध पाण्याची उपलब्धता आपल्याकडे सर्वांत कमी आहे. आपल्याकडचे प्राथमिक शिक्षण अतिशय कमी दर्जाचे आहे. अशा किती तरी समस्या मी सांगू शकेन. तातडीने सोडवल्या पाहिजेत अशा समस्या आपल्याकडे भरपूर आहेत हे त्यातून ध्यानी घ्या. 

मग आपली आशा तरी कोणती? आमच्या- आपल्या देशाच्या आशा तुमच्यासारख्या तरुणांवर खिळलेल्या आहेत. बुद्धिमत्ता, उत्साह, ऊर्जा, आत्मविश्‍वास अशा कोणत्याही बाबतीत तुम्ही पाश्‍चात्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी नाही. तरीही आपले विद्यार्थी संशोधनात मागे का पडतात? ते बाहेरच्या जगात भरीव योगदान का देऊ शकत नाहीत? याचा विचार समाजातल्या धुरिणांनी करायला हवा. अभ्यासक, राजकारणी, प्रशासक, उद्योगपती सर्वांनीच या बाबीची गांभीर्याने चर्चा केली पाहिजे आणि त्यावर तातडीने उपाय शोधला पाहिजे. 

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरच्या कोणाही पंतप्रधानाचे या समस्येकडे लक्ष गेलेले नाही. नेहरू 1962मध्ये अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले, तेव्हा तिथे पीएच.डी. पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणांना त्यांनी भारतात येण्याची हाक दिली. देशातल्या दुर्गमातील दुर्गम आणि गरिबातील गरीब मुलापर्यंतही चांगले शिक्षण, पोषण, निवारा आणि आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी सरकारला साह्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला मिळालेल्या प्रतिसादातून भारतात हरितक्रांती, धवलक्रांती (अन्नधान्य व दूधदुभत्याची सुबत्ता) साकारली. अणुऊर्जा आणि अवकाश संशोधन क्षेत्रात आपण प्रगती साधली. मित्रांनो, साठच्या दशकात जी किमया आपण साधली, त्याची पुनरावृत्ती करण्याची आता गरज आहे. 

ही किमया आपण पुन्हा कशी साधू शकू? त्यासाठी अभ्यासक, संशोधक, विद्वानांबद्दल आदराचे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक, कंपन्यांच्या संचालकांना सरकारदरबारी आणि समाजातही उचित मान मिळाला पाहिजे. परदेशी विद्यार्थी आणि बुद्धिमंतांचे आपण खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. आपल्याकडील चमकदार विद्यार्थी आणि शिक्षकांना परदेशांमधील चांगल्या विद्यापीठांमध्ये जाण्याची, तिथे शिकण्याची संधी मिळाली पाहिजे. परदेशी संशोधक, विचारवंतांशी आपण खुलेपणाने कल्पनांचे आदानप्रदान केले पाहिजे. तरुण शिक्षक, संशोधकांना हव्या त्या विषयात संशोधन करण्यासाठी सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. 

संशोधनावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय कोणत्याही उच्च शिक्षण संस्था यशस्वी होऊ शकत नाहीत. कुतूहल, साहस, संघभावना, प्रश्नांना भिडण्याची वृत्ती यातून संशोधन उभारी घेते. आपल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे समस्या ओळखता आल्या पाहिजेत. प्रश्न नेमका ओळखता येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपण संशोधनाची ओळख करून दिली पाहिजे. जागतिक पातळीवरील संशोधक, विद्वानांशी चर्चेची संधी त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागासाठी त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. त्यातूनच संशोधनासाठी आवश्‍यक मानसिकता तयार होईल. 

हवे खुले, स्वतंत्र मन 
शिक्षण घेऊन बाहेर पडणारे तुमच्यासारखे विद्यार्थी आपल्या संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी आणि देशाच्या विकासात योगदान देणारे शास्त्रज्ञ, अभियंते होण्यासाठी खूप काही करू शकतात. त्यासाठी स्वतंत्रपणे विचार करू शकणारे आणि प्रश्नांची सोडवणूक करू शकणारे, कुतूहलाने भरलेले मन सर्वांत प्रथम आवश्‍यक आहे. अशा मनांमध्येच नव्या कल्पना जन्म घेतात. तुम्ही शिकण्यावर लक्ष केंद्रित करा. शिकणे किंवा अध्ययन म्हणजे काय असते? विशिष्ट प्रसंग, उदाहरणांमधून सार्वजनिक, सार्वकालिक ठरू शकेल असा निष्कर्ष काढता येणे आणि नवनव्या व अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांचा उपयोग करू शकण्याची क्षमता म्हणजे शिकणे असे मला वाटते. शिकायला शिकणे म्हणजेच शिक्षण आहे. तुमच्याभोवती जे काही घडते आहे त्याचा अर्थ आणि नव्या कल्पना समजून घेण्यासाठी वर्गात शिकलेल्या संकल्पनांचा तुम्हाला उपयोग व्हायला हवा. लक्षात ठेवा की, तुम्ही एखादा लहानसा का होईना प्रश्न स्वतःच्या प्रतिभेने सोडवता, तो एक नवा शोधच असतो. त्यातून मोठ्या समस्यांची उकल करण्याची तुमची क्षमता वृद्धिंगत होते. 

शिक्षणाचे लोकशाहीकरण ही विकासासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारतीय विज्ञान संस्थेची त्यासाठी असलेली बांधिलकी अभिनंदनीय आहे. मात्र, त्याच वेळी वर्गांमध्ये विलक्षण असणाऱ्या, नेहमी अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणातला रस हरवणार नाही, याची खबरदारीही घेणे आवश्‍यक आहे. अनेक अमेरिकी विद्यापीठांमध्ये अशी यंत्रणा आहे. उदाहरणार्थ, संगणक विज्ञान किंवा तत्सम क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या दहा ते पंधरा टक्के विद्यार्थ्यांना आवडीच्या वेगळ्या विषयांचे विशेष प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाते. उदाहरणार्थ, ऑपरेटिंग सिस्टीम, अल्गॉरिदम, डाटाबेस, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा क्षेत्रांत ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दुप्पट-तिप्पट अभ्यासक्रम तेवढ्याच कालावधीत पूर्ण करतात. ते स्वतःची उच्च दर्जाची मानके प्रस्थापित करतात. आपल्याकडेही असे करता येईल. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही आपल्या विषयाशी संबंधित पुस्तके आणि संशोधन नियतकालिके वाचण्याची सवय तुम्ही कायम ठेवली पाहिजे. माझा असा पुस्तकांचा खास संग्रह आहे. तुमचे स्वतःचे असे ग्रंथालय तयार करा. दररोज किमान काही पाने वाचा. त्यातील कल्पनांचा विचार करा आणि तुमच्या भोवतालचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. 

परीक्षांच्या पलीकडे... 
एखाद्या विद्यार्थ्याला विषय किती समजला आहे हे जाणून घेण्यासाठी परीक्षांचे महत्त्व नाकारता येणार नाही. मात्र, केवळ परीक्षार्थी बनण्याचे किंवा त्यावरच सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्याचे धोकेही लक्षात घ्या. शिक्षणाचा तुम्हाला आयुष्यभर दीर्घ काळ उपयोग व्हायला हवा. परीक्षा संपली की आपल्या विषयाच्या मूलभूत संकल्पनाही लक्षात नाहीत असे अनेक तरुण मला आढळतात. संबंधित विषयाच्या मूलभूत संकल्पना आयुष्यभर तुमच्यासोबत राहिल्या पाहिजेत. त्यांचा तुम्ही शक्‍य तितका वापर केला पाहिजे. नव्या ज्ञानाची त्यात भर घातली पाहिजे आणि त्या अद्ययावत केल्या पाहिजेत. नवे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नव्या कल्पना समजून घेण्यासाठी त्यांचा उपयोग तुम्ही केला पाहिजे. 

तुमच्या कार्यक्षमतेबरोबरच व्यावसायिकताही तितकीच महत्त्वाची आहे. व्यावसायिक म्हणजे आपल्या व्यवसायाला वाहून घेतलेला आणि त्याच्या नीतिमूल्यांचे काटेकोर पालन करणारा. व्यावसायिक गोष्टींमध्ये तो व्यक्तिगत संबंधांची सरमिसळ होऊ देत नाही. तो समतोल आणि निःपक्ष असतो. तो माहितीचे विश्‍लेषण करून वस्तुनिष्ठ निर्णय घेतो. तो अतिशय परिश्रम करतो आणि समाजातील सर्वांचे आणि पुढच्या पिढीचे आयुष्य सुखकर होण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करतो. तो नेहमी मोठी स्वप्ने पाहतो. अशक्‍य हा शब्द त्याच्या कोशात नसतो. बुद्धिमत्ता, ज्ञान आणि नीतिमूल्ये हीच त्याची खरी संपत्ती असते. त्याची व्यक्तिगत कामगिरी उत्तम असतेच; पण संघभावनेने काम करण्यातही तो कुठे कमी पडत नाही. माझ्या मते कोणतेही सांघिक काम हे एखाद्या सिम्फनीसारखे किंवा वाद्यवृंदासारखे असते. संचालकाच्या सूचनेनुसार प्रत्येकजण आपला सूर अचूक राखतो. त्यातूनच दिव्य संगीताची रसिकांना अनुभूती येते. सध्याच्या गुंतागुंतीच्या आणि जागतिक उद्योगक्षेत्रात अशा प्रकारचे सांघिक कार्य अत्यावश्‍यक आहे. 

तुमच्यापैकी प्रत्येकजण यशस्वी होईल असा विश्‍वास मला आहे. माझ्या दृष्टीने यश म्हणजे तुमच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येणे. तुम्ही किती बुद्धिमान आहात किंवा तुमच्याकडे किती संपत्ती आहे यातून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत नाही, तर तुम्ही त्यांची किती काळजी घेता आणि त्यांचे आयुष्य किती सुखकर करता यावर ते अवलंबून असते. तेव्हा तुम्हीही मजेत जगा आणि सतत आनंदी रहा. कारण आनंदी मनच समाजात भरीव सकारात्मक योगदान देऊ शकते. 

No comments:

Post a Comment