Sunday, 15 January 2017

श्री. गणपतीअथर्वशीर्ष म्हणजे काय?–
गणेशाच्या ज्या स्तोत्राला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ते महान स्तोस्त्र गणपती अथर्वशीर्ष होय! गणपती अथर्वशीर्ष असे का म्हटले आहे? जे गणपती उपनिषद् आहे ते अथर्ववेदाचे, अथर्वण वेदाचे आहे असे परंपरेने मानले आहे. वेद हे शब्द्ब्रह्म आहे आणि ते शब्दब्रह्म अपौरूशेय आहे, हाही खुलासा आपण प्रारंभी केला. आता समजावून घ्या, की हे "अथर्वशीर्ष" आहे. त्याला याच नावाने का सम्बोधिले जाते? दुसरे नाव का दिले जात नाही? वस्तुत: गणपती अथर्वशीर्ष असे नाव का प्रस्तुत झाले? आणि ते इतके लोकप्रिय का झाले? सर्वांनी त्याला शिरोधार्थ का केले?
महाराष्ट्रात घरोघरी गणपती अथर्वशीर्ष म्हणतात. पण सगळ्यांनाच गणपती अथर्वशीर्ष या शब्दाचा अर्थ माहीत असेलच असे नाही. आपण समजावून घेऊ. काय अर्थ आहे? गण-पती कोण आहे ते आपण पहिले. गणांचा जो पती (म्हणजे शंकराने जे जे प्रगट केलेले आहेत,) त्यांचा तो अधिपति आहे. याचा अर्थ आपल्या लक्षात आला का पहा. शंकराला "भूतेश" असे म्हटले. भूतांचा तो ईश आहे. त्याने कोणते गण प्रकट केले? भूत, पिशाच्च, त्याच्या भोवती नाचत असतात असे म्हटले आहे. पण त्यालाही काही लक्षणार्थ आहे. सगळ्याच गोष्टी वाच्यार्थाने घ्यायच्या नसतात.
टिळक रस्ता टिळक स्मारक मंदिरावरून जातो, याचा लक्षणार्थ घ्यायचा असतो. कुणी टिळक स्मारक मंदिरावर चढून जर बघायला लागले तर काय करणार? त्याच्यातला लक्षणार्थ स्वीकारायचा असतो. मग तो लक्षणार्थ काय आहे? हे जे सगळे भूतगण आहेत ना ते गण कोणते? ते अनंत विद्यांचे आणि अनंत कलांचे आहेत. कारण सर्व कला, सर्व विद्द्या, सर्व शास्त्रे शंकरापासून निघालेली आहेत. नृत्य त्यानेच दिले. अभिनय त्यानेच दिला. संगीत त्यानेच दिले आहे. तांडव करून "लय" काय असते तेही त्यानेच प्रकट केले आहे. व्याकरणासारखी अवघड शास्त्रे हे देखील त्याच्यापासून निर्माण झालेली आहेत. मग तो शंकर असे विविध शास्त्रांचे, विविध ज्ञानांचे, कलांचे गण प्रकट करत असतो. त्या सगळयांचे आधिपत्य कुणाकडे असेल तर ते "गणेशाकडे" आहे. कारण सगळी विद्द्या, सगळ्या कला, ते सगळे गण तो आपल्या ठायी धारण करतो आणि त्यांचा तो अधिपति होतो. म्हणून तो गणपती आहे. त्याचा समास दोन प्रकारे सोडवता येईल. गणांचा पती म्हणता येईल. म्हणजे षष्ठी तत्पुरुष समास झाला आणि गणपती असेही म्हणता येईल. म्हणजे गणांचा तर पती आहे, पण गणरूपी आहे. म्हणजे ज्ञान, सगळ्या कला, सगळ्या विद्द्या, सगळी शास्त्रे, त्याने धारण केली आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून तो गणरूपी पती होतो.
असा हा गणपती, त्या गणपतीचे अथर्वशीर्ष ! "शीर्ष" हा शब्द हेतू पूर:स्पर योजलेला आहे. कारण असे आहे की सगळ्या अवयवानमध्ये 'शीर्ष' प्रधान आहे. कारण तिथे बुध्दी आहे. बुध्दीशिवाय माणसाला निर्णय करता येत नाही. बुध्दिशीवाय निश्चय करता येत नाही. बुध्दी शिवाय मनुष्य सत्कर्म करायला प्रवृत्त होत नाही. बुध्दी शुध्द झाल्याशिवाय आत्मसाक्षात्काराचा मार्ग मानवाला दिसत नाही, ईश्वराचे निर्गुण आणि सगुण रूप उलगडत नाही.
थर्व म्हणजे चंचलता. चंचलता आहे तोवर सात्विक यज्ञ, तप, दान घडू शकत नाही. मन, शीर्ष, हे अथर्व करायचे असेल म्हणजे त्यातील चंचलता घालवायची असेल तर अभ्यास, वैराग्य धारण करून उपासना करा. कारण उपनिषदांनी आम्हाला सांगितले आहे की ब्रह्मविद्द्येचा पाया, अधिष्ठान कोण असेल तर तप आहे, शुचिता आहे, उपासना आहे. ही उपासना ॐकाराची करायला सांगितली आहे. ॐकार आणि गणेश यांच्यामध्ये तादृष् काही फरक नाही. म्हणून ज्यावेळी ॐकाराची उपासना आप्ण करतो त्यावेळी थर्वता म्हणजे सगळी चंचलता जाते.
संतांनी आम्हाला हेच सांगितले, तुकाम्हणे मना पाहिजे अंकुश| नित्य नवा दिस जागृतीचा||
तो "जागृतीचा नवा दिस" जर आपल्या चित्तामध्ये आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये उजाडायला हवा असेल तर आपणॐकाराची उपासना करायला प्रारंभ केला पाहिजे. "अथर्वशीर्ष" म्हणजे बुध्दिचा अंकुश लावून मनाची चंचलता घालवणे. मनाला स्थिर करणे. मग मनुष्य आत्मोन्नतिकडे झेपावेल. उपासनेची दृढ बैठक त्याला लाभेल आणि मग त्या अथर्वशीर्षरूपी उपासने मधून गणपतीचे, गणेशाचे साक्षात दर्शन उपासकाला घडेल. जे बध्द आहेत ते मुमुक्षु होतील, जे मुमुक्षु आहेत ते साधक होतील, आणि जे साधक आहेत त्यांची सिध्दावस्थेमध्ये परिणती होईल, एवढे सामर्थ्य या अथर्वशीर्षामध्ये आहे. महापापापासून, महावीघ्नांपासून उपासकाची मुक्तता होईल असे आश्वासन अथर्वशीर्षाच्या फलस्वरूपामध्ये दिले आहे.
"महावीघ्नात्प्रमुच्यते |महापापात्प्रमुच्यते |". हे प्रत्यक्ष अथर्वशीर्षात सांगितले आहे. पण केव्हा? बुध्दिचा अंकुश लागला आणि चंचलता नाहीशी झाली की मगच! माणसाची बुध्दी, मन, चित्त, अंत:करण, चतुष्टय स्थिरावले, की मग हा मार्ग दिसायला लागेल आणि गणपतीचे साक्षात दर्शन आपल्याला घडेल अशी ग्वाही गणकऋषींनी आपल्याला दिली आहे. म्हणूनच या उपनिषदाला नाव पडले आहे
श्री.गणपतीअथर्वशीर्ष!

No comments:

Post a Comment