Wednesday, 28 December 2016

🌼🌼🌼जीवन शांततेत /आनंदात जगायचय🌼🌼🌼

तर हे ५ मिनिटे वेळ काढून अवश्य वाचा
सकारात्मक विचारांचे सामर्थ
मित्रानो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे
मनात दररोज (24 तासांत) 60 हजार विचार येतात. यातील 60 ते 70% विचार हे नकारात्मक असतात. दर 15 ते 20 सेकंदाला नवीन विचार हे चक्र अव्हयातपणे चालू असतं.
*ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्‍वात जेवढी नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती उरते व उदासी - भय - यातून नैराश्याकडे वाटचाल सुरू होते*.
रेडिओ किंवा वाहिन्या ज्या ब्रँडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते. म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते.
सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्‍वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’!
*थॉमस् अल्वा एडिसनने* 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रमाणे फसले याबाबत तुला काय वाटले ?
थॉमस म्हणाला 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (सकारात्मक दृष्टीकोन)
*नेपोलियन* समुद्र किनार्‍यावर सैन्यासमोर जहाजातून उतरताना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे....
मित्रांनो सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे.
टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्‍वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य (Depression) येते.
*गौतम बुध्दाजवळ* एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्‍यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ भगवान म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, *जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा*.
येथे आणखी एक उदाहरण पाहूया
अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण ह्या कैद्यावर काही प्रयोग करूयात. तेव्हा त्या कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी कोब्रा डसवून मारू.
त्याच्या समोर एक मोठा विषारी साप आणला गेल्यानंतर त्या कैद्याचे डोळे बंद करून त्यास खुर्चीला बांधले. आणि त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचण्यात आल्या आणि काय आश्चर्य त्या कैद्याचा दोन सेकंदात मृत्यू झाला.
पोस्टमॉर्टेम केल्यानंतर समजलं, की कैद्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम'सदृश्य विष आहे.
आता हे विष कुठून आलं, की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं!
आपल्या प्रत्येक संकल्पामुळे पॉजिटिव किंवा निगेटिव एनर्जी उत्पन्न होते व त्यानुसार आपल्या शरीरात Hormones उत्पन्न होतात.
90% आजारांचं मूळ कारण नकारात्मक विचारांनी उत्पन्न होणारी ऊर्जाच आहे.
आज मनुष्य आपल्या चुकीच्या विचारांनी भस्मासुर बनून स्वत:चा विनाश स्वत:च करतोय.
मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्‍याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती *अब्दुल कलामांना* नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते.
म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.
*कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत*
अरे डोळे उघडून बघा-प्रत्येकाला उडण्यासाठी-फुलपाखरासारखे पंख आहेत
म्हणून
आपले विचार सदैव सकारात्मक ठेवा आणि आनंदी रहा.
Life Is Beautiful, Enjoy Forever.

|| श्री राम जय राम जय जय राम ||

|| जय हनुमान|| 

🌼🌼🌼प्रदोष म्हणजे काय? 🌼🌼🌼

प्रदोष व्रत
म्हणजे प्रत्येक भारतीय महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला करावयाचे एक व्रत आहे. प्रदोष वेळेस हे व्रत आचरितात म्हणून यास प्रदोषव्रत असे म्हणतात. हे भगवान शंकराचे व्रत आहे. हे व्रत करणार्‍याने, त्या दिवशी सकाळपासून उपवास करावयाचा असून सायंकाळी सूर्यास्ताचे वेळी आंघोळ करावयाची असते. त्यानंतर, शिवाची षोडशोपचार पूजा करावयाची असते. किमान २१ महिने वा २१ वर्षे हे व्रत करावयाचे असते.
*प्रदोष वेळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे ३ घटिकापर्यंतची (सुमारे १ तास १२ मिनिटे) वेळ होय.*
*शनिप्रदोष*
हे पुत्रसंततिप्राप्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.शनिवारी प्रदोष म्हणजे त्रयोदशी असतांना शनिप्रदोष होतो
*अर्कप्रदोष'*
हे आयुरारोग्यवृद्धीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.रविवारी त्रयोदशी तिथी आली असता अर्कप्रदोष होतो.
*'सोमप्रदोष'*
हे आनंद, शांतिरक्षणासाठी व पारमार्थिक कल्याणासाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.सोमवारी त्रयोदशी तिथी आली असता सोमप्रदोष होतो.
*भौमप्रदोष*
हे कर्जमुक्तीसाठी करण्यात येणारे एक प्रकारचे शिवाचे व्रत आहे.मंगळवारी त्रयोदशी तिथी आली असता भौमप्रदोष होतो.
*बुधप्रदोष*
सर्व प्रकारच्या पापातून मुक्त करण्यात येणारे एक प्रकारचे व्रत आहे.
*बृहस्पतिप्रदोष*
अथवा गुरुप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, अशी धार्मिक कल्पना आहे.. पुराणातल्या एका कथेनुसार गुरुप्रदोष व्रताच्या साहाय्याने इंद्राने वृत्रासुरावर विजय प्राप्त केला होता. गुरुवारी त्रयोदशी ही तिथी आली असता, तो दिवस बृहस्पतिप्रदोष होतो, आणि त्या दिवशी त्याच नावाचे व्रत करतात.
*शुक्रप्रदोष*
 हे व्रत धर्म, अर्थ, काम व मोक्ष प्राप्ति साठी केले जाते. तसेच भगवान शंकरास प्रसन्न करून घेण्यासाठीही हे व्रत केले जाते.शुक्रवारी त्रयोदशी तिथी आली असता शुक्रप्रदोष होतो.

🌼🌼🌼पसायदानाचा अर्थ…..🌼🌼🌼.

प सा य दा न
आता विश्वात्मके देवे |
येणे वागज्ञे तोषावे |
तोषोनि मज द्यावे पसायदान हे |
आता म्हणजे ज्ञानेश्वरी लेखन पूर्ण झाल्यावर ज्ञानेश्वर विश्वात्मक असा जो सर्व धर्मातीत देव त्याला विनंती करत आहेत कि त्याने ह्या वांग्मय यज्ञाने प्रसन्ना व्हावे आणि मला या प्रसादाचे दान द्यावे. सर्व विश्व हेच माझे घर आहे, नव्हे आपणच सर्व विश्व जो बनला आहे अशा अत्मानुभूतीने संपन्न आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथाना त्यांनी विश्वात्मक हि उपाधी दिली आहे. यज्ञ म्हणजे निष्काम भावाने केलेले कर्म अशी व्याख्या गीतेने केली आहे. गीतेवरील टीका हा वांग्मय यज्ञ आहे असे ते म्हणतात. या यज्ञाने प्रसन्न होऊन गुरुनी प्रसाद द्यावा असे ते म्हणतात…
जे खळांची व्यंकटी सांडो |
तया सत्कर्मी रती वाढो |
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे |
जे चा संबंध मागच्या ओवीशी आहे. मला या प्रसादाचे दान द्या कि, असा त्याचा अन्वय लावून येथून पुढे कोणत्या गोष्टी मिळाव्यात त्याचा उल्लेख आहे…
खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे असे मागणे मागितले आहे. त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न होवो असे झाले म्हणजे कोणाशी त्याचे शत्रुत्व राहणार नाही. सर्व प्राण्यांमध्ये मैत्रीचा व्यवहार होईल. मनुष्याच्या प्रवृत्तीला तो स्वतःच जबाबदार आहे, त्याने स्वतःच स्वताचा उध्दार करायचा आहे असे भगवंत येथे सुचवतात…
दुरितांचे तिमिर जावो |
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात|
दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात पाहावे मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल.
पाप म्हणजे काय?
सत्व रज आणि तम या तीन गुणांच्या कमी-अधिक प्राबल्याने मनुष्याचे आचरण बनते. रज, तम च्या जोराने काम आणि त्यामुळे लोभ, मद, मोह, मत्सर हे शत्रू बलवान होतात, मानव पापाचरणास प्रवृत्त होतो. म्हणून स्वधर्म म्हणजे निष्कामवृत्तीने कर्माचरण. हा गीतेचा मुख्य विषय आहे. भागवतधर्माचे सारही हेच आहे. स्वधर्म आचरणाच्या प्रकाशात सर्वाना पाहिजे ते मिळेल असे ज्ञानेश्वर म्हणतात.
वर्षत सकल मंगली |
ईश्वर निष्ठांची मांदियाळी |
अनवरत भूमंडली | भेटतु या भूता |
या पृथ्वीतलावर संपूर्ण मांगल्याचा अखंड वर्षाव करणारा ईश्वरनिष्ठांचा समुदाय सर्व प्राण्यांना भेटो. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याचे समाज अनुकरण करतो. त्याच्या वागण्यातून सामान्यांना धर्म कळतो. त्याच्या हृदयातील ज्ञानदिपाच्या प्रकाशात योग्य मार्ग दिसतो. ईश्वरनिष्ठ आपल्या आत्मज्ञानाने पूर्णतया संसाराकडे पाठ फिरवून मुक्त झालेला असतो, पण समाज हिताकरता त्याने कर्मत्याग न करता लोकसंग्रह करीत समाजाचा एक घटक म्हणून जगले पाहिजे. याकरता श्रीकृष्णांनी स्वत:चे उदाहरण दिले आहे. गीतेची हीच शिकवण आहे समाजातील सर्वांचेच आचरण शुध्द झाले पाहिजे, तरच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे मोठा समूह तयार होईल. हे श्री ज्ञानदेवांचे मागणे आहे.
चला कल्पतरूंचे आरव |
चेतना चिंतामणीचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषांचे |
ईश्वर निष्ठांचे वर्णन करण्यासाठी येथे ज्ञानेश्वरांनी तीन काव्यमय उपमा दिल्या आहेत. जे चालणारे कल्पतरूंचे बगीचे आहेत सजीव अशा चिंतामणीचे गाव आहेत अमृताचा बोलणारा समुद्र आहेत. चल म्हणजे चालणारा. कल्पतरू म्हणजे जे मागाल ते देणारे झाड. पण त्याच्याकडे आपल्याला जावे लागते, तर सज्जन मात्र कल्पतरू तर आहेतच, शिवाय तेच स्वतः तुमच्याकडे येतात. शिवाय ते कल्पतरू प्रमाणे एकच नाहीत, तर त्यांची बागच आहे. चिंतामणी म्हणजे जे चिंताल ते देणारा दगड. संतही जे चिंताल ते देतात म्हणून ते चिंतामणी आहेत, शिवाय ते सजीव असल्याने देताना योग्य व अयोग्य याचा विवेक बाळगतात, आणि चिंतामणी प्रमाणे ते दुर्मिळ नाहीत, तर त्यांचे समूह आहेत.
अमृताचा एक थेंब अमरत्व देतो, संत हे अमृताचा बोलणारा सागर आहेत म्हणून ते साऱ्या समाजाला अमर करू शकतात.
चंद्रमे जे अलांछन | मार्तंड जे तापहीन |
तेसर्वाही सदा सज्जन | सोयरे होतु |
येथे संतांची तुलना चंद्र आणि सूर्याशी केली आहे . जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात. संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. सूर्य जगाला प्रकाश आणि उष्णता देतो, पण तो दाहक आहे, संत ज्ञानाचा प्रकाश देतात पण ते दाहक नाहीत. अशाप्रकारे गीतेतील तत्वज्ञानाचे मूर्त स्वरूप असे जे संत, त्यांचे श्रेष्ठत्व श्री ज्ञानेश्वर वर्णन करतात.
किंबहुना सर्वसुखी |
पूर्ण होऊनी तिन्ही लोकी |
भजिजो आदिपुरुषी | अखंडित |
स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकातील सर्वांनी सर्व प्रकारे सुखी होऊन त्यांनी आदिपुरुषाची अखंडित भक्ती करावी अशी प्रार्थना ज्ञानेश्वर करतात. दुष्ट पुरुषाची दुर्बुद्धी नाहीशी होऊन त्याला सत्कर्मात रती उत्पन्न होईल. पापाचा अंधार नाहीसा होऊन स्वधर्माचा सूर्योदय होईल. ईश्वर निष्ठांचे समूह मांगल्याचा वर्षाव करतील. चारित्र्यवान पुरुष सर्व प्राणिमात्राचे सोयरे होतील. असे आदर्श समाजचित्र सुखी जीवनाचा मार्ग आहे. समाजाचे सर्व घटक सदाचरणी झाल्याशिवाय सर्व सुखी होणार नाहीत. आदिपुरुष म्हणजे परमात्मा. जो हे जाणतो कि परमात्माचे सर्वत्र अस्तित्व आहे, तो स्वतः त्याच्याशी एकरूप होतो. भक्त आणि भगवंत यात भेद उरत नाही. या आदिपुरुषाची पूजा करावी स्वकर्म -कुसुमानि. हेच त्याचे भजन होय.
आणि ग्रंथोपजीविये | विशेषी लोकीं इये |
दृष्ठादृष्ठविजयें | होआवें जी |
आणि विशेषतः या जगात हा ग्रंथ ज्यांचे जगण्याचे साधन, आधार झाला आहे, त्यांना दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही विजय मिळोत. गीतेत कर्मयोग आणि भक्ती हे परमात्म्यापर्यंत सर्वाना पोहोचण्याचे जे मार्ग सांगितले आहेत त्यासाठी साधनेची, ज्ञान किंवा योग मार्गातील तपस्येची गरज नाही. आपले सामान्य जीवन जगताना गीतेने सांगितलेल्या सत्वगुण युक्त मार्गाने चालले आणि परमात्म्याचे सतत नामस्मरण केले, तर या जीवनात म्हणजे दृष्ठ आणि मरणोत्तर म्हणजे अदृष्ट असे दोन्ही विजय लाभतील असे श्री ज्ञानेश्वर म्हणतात. जीवनात आणि जीवनोत्तर नैतिकतेने विजयी होणे ह्याला भारतीय तत्वज्ञान जे महत्व देते तेच त्याचे वेगळेपण आहे.
तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो |
हा होईल दान पसावो |
येणे वरे ज्ञान देओ | सुखिया झाला |
तेंव्हा विश्वाचे राजे म्हणले “या प्रसादाचे दान मिळेल.” या वरामुळे ज्ञानेश्वरांना आनंद झाला. श्री निवृत्तीनाथ गुरु यांना येथे विश्वाचा राजा म्हणून संबोधिले आहे. ते म्हणाले कि ही ग्रंथरचना करताना ज्ञानेश्वरांनी जे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश ठेवला तो सफल होवो. या मराठी भाषेच्या नगरी ब्रह्मविद्या इतकी सर्वां पर्यंत पोहोचो की जग सुखमय होवो. श्रोत्यांनी मन एकाग्र करून या ग्रंथाचे श्रवण केले आणि त्याप्रमाणे आचरण केले तर ते सुखी होतील हे ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा पूर्ण होवो. अशा रीतीने या वाकयज्ञाचा उद्देश पूर्ण झाला म्हणून ज्ञानेश्वरांना आनंद झाला.